पुणे पोलीस आयुक्तांनी इस्टाग्रामव्दारे नागरीकांशी साधला थेट संवाद

पुणे, 6 मे 2021: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी “Ask Me Anything” या उपक्रमाअंतर्गत इस्टाग्रामव्दारे नागरीकांशी थेट संवाद साधला. या उपक्रमाला नागरिकांकडूनही अतिशय उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 250 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारले, तर पोलीस आयुक्तांनी देखील दिलखुलासपणे संवाद साधला.

सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचून त्यांच्या मनात पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करणे, या या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमात 9786 नागरिक सहभागी झाले होते, 250 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारले तर 7850 पेक्षा अधिक नागरिकांनी लाईक्स केले. नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नंमध्ये मुख्यत: SPO, सायबर फसवणुक व वाढती गुन्हेगारी, याचा समावेश होता.नागरिकांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त गुप्ता यांनी देखील प्रत्येक प्रश्नांस मार्मिक व अचूक उत्तर देवून नागरिकांशी अतिशय उत्साहाने संवाद साधला.

यापैकी काही प्रश्नांची झलक :
प्रश्न: सर मी माझ्या सावत्र आईकडून केल्या जाणाऱ्या मानसिक छळाचा सामना कसा करू?
उत्तर : तुम्हाला येणाऱ्या वाईट अनुभवाबद्दल जाणून वाईट वाटले. पारदर्शक संवाद हा यामध्ये एक महत्वाची भूमिका निभावतो. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणीशी याबाबत संवाद साधला का? आम्ही तुम्हाला कायदेशीर बाबीत मदत करू शकतो. तुम्हाला वाटले की गोष्ट खूप टोकाला पोहचली आहे, तर थेट माझ्याशी संपर्क करा.

प्रश्न: पोलीस महिलांना गरजेच्या वेळी खरंच मदत करतात का?
उत्तर : कोई शक? आणि जर तुम्हाला अन्य काही अनुभव आले असतील तर मला सांगा मी ऐकतोय. महिलांची सुरक्षा आणि आधार याकडे दुर्लक्ष कधीही स्वीकारार्ह नाही.

प्रश्न : सध्याच्या काळात न थकता सतत काम करण्याचा काही फायदा पोलिसांना होतो का?
उत्तर : नक्कीच, त्याबदल्यात आम्हाला नागरिकांकडून कधीही न संपणारे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळतात.
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी अश्या प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत, अशी विनंती केली. तसेच पुणे शहर पोलीस करत असलेला कामाबाबत समाधान व्यक्त करुन कामाचे कौतुक केले.