बालदिनानिमित्त पुण्यातील शालेय विद्यार्थी असलेल्या आर्यन काशीकरचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न

पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२१ : आज देशभरात साजरा होत असलेल्या बालदिनाचे औचित्य साधत पुण्यातील सिंम्बायोसिस शाळेत इयत्ता ९ वीचा विद्यार्थी असलेल्या आर्यन काशीकर याने ओरिगामी कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ११ महिन्यांच्या अथक प्रयत्नांद्वारे आर्यनने कागदाच्या वापरातून तयार केलेल्या २,१११ हून अधिक सील माशांच्या प्रतिकृतींचे एक आगळे वेगळे प्रदर्शन प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिस शाळेच्या बॅडमिंटन कोर्टवर भरविण्यात आले होते.

सुमारे १८ फूट बाय ३६ फुट इतक्या जागेत या सर्व प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक प्रतिकृती साधारणतः ३ इंच इतक्या आकाराची होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला याआधीचा २००० सील माशांच्या प्रतिकृतींचा विक्रम मोडण्याचा आर्यनचा हा प्रयत्न आहे. यादृष्टीने आज सदर प्रयत्नाचे परीक्षण केले गेले. परीक्षक म्हणून ओरिगामी कलेच्या क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या व पुण्यातील ओरिगामी मित्र या संस्थेच्या मानद सदस्या स्वाती धर्माधिकारी, अॅड. श्रीकांत दळवी आणि अॅड. दिपाली डुंबरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

आर्यनची आई प्रज्ञा काशीकर, वडील अमित काशीकर, प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिसच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा हवनुरकर, सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे संचालक डॉ. एस एस ठिगळे आणि येथील प्रतिकृतींच्या मांडणीचे रचनाकार आशिष खळदकर आदी या वेळी उपस्थित होते.

आपला देश या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आर्यनने आपल्या प्रतिकृतींची मांडणी ही खास तिरंग्याच्या रंगात साकारली होती, तसेच सील माशांच्या प्रतिकृती साकारून सागरीजीवन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील त्याने केला आहे हे विशेष.

याविषयी अधिक माहिती देताना आर्यन म्हणाला, “वयाच्या सातव्या वर्षी आई वडिलांनी माझी या कलेशी ओळख करून दिली आणि मला ही कला आवडू लागली. त्यानंतर यु ट्यूबच्या आणि पुण्यातील ओरिगामी मित्र यांच्या माध्यमातून मी हळूहळू ती शिकू लागलो, त्यापासून वस्तू बनवू लागलो. २०१९ साली ओरिगामी मित्र आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वंडरफोल्ड या चार दिवसीय प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी प्रदर्शनात भेट देणा-या अनेकांनी माझे कौतुक केले. त्यामुळे यामध्ये आणखी काय करता येईल, या उत्सुकतेने वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची कल्पना आली. आज नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाला याचा मला आनंद आहे.”

खरेतर टीव्ही, मोबाईलपासून आर्यनला थोडे दूर ठेवावे, या उद्देशाने आम्ही आर्यनला ओरिगामीची ओळख करून दिली. या कलेच्या क्षेत्रातील आर्यनचा प्रवास पालक म्हणून आमच्यासाठी संस्मरणीय आहे. मागील ११ महिने आर्यन यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याने एकट्याने २,१११ ओरिगामी कागदांच्या फोर्ल्डस करीत कोणाचीही मदत न घेता केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे आर्यनची आई प्रज्ञा काशीकर यांनी नमूद केले.

प्रभात रस्त्यावरील सिंम्बायोसिस येथील बॅडमिंटन कोर्ट येथे एका शीटवर ५० प्रतिकृती याप्रमाणे ४२ शीट्सवर १८ बाय ३६ फूट डिस्प्लेवर आर्यनने बनविलेल्या एकूण २,१११ प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. बाजारात उपलब्ध असलेला उत्तम दर्जाचा ओरिगामी कागद या सर्व प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आला. तसेच आयएसबीएन नोंदणी असेल्या ‘अॅनीमल ओरीगामी फॉर इनथूझियास्टस्’ या जॉन माँट्रोल लिखित पुस्तकात दिल्याप्रमाणे कागदाच्या घड्या घालून या सील माशांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचे परीक्षण करीत याचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत हे सर्व लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अमित काशीकर यांनी दिली.

ओरिगामी कलेद्वारे आपण संयम, सातत्य, एकाग्रता यांसारख्या गोष्टी आत्मसाद करू शकतो याचा अनुभव आल्यानंतर शाळा, महाविद्यालये इतकेच नाही तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत अनेकांना ही कला शिकविण्यासाठी आर्यन प्रयत्नशील आहे. आजवर त्याने प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून याविषयीचे अनेक क्लासेस घेतले असून ही कला शिकविण्यासाठी तो स्वत: एक यु ट्यूब चॅनल देखील चालवित आहे.