पुणे, ११/०१/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी , प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावर्षीचा पदवी प्रदान सोहळा खास ठरणार आहे. विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात ८५ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, १९ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २२६ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, १८७ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ४ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यक्रमात 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना पी.सी अॅलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काही निवडक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाने तर काहींना त्यांच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन