12व्या ओम दळवी मेमोरियल मातोश्री वरदविनायक एआयटीए 18वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत निशित रहाणे, कायरा चेतनानी यांना दुहेरी मुकुट

पुणे, 11 नोव्हेंबर, 2022:  ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 12व्या ओम दळवी मेमोरियल मातोश्री वरदविनायक एआयटीए 18 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या निशित रहाणे याने तर, मुलींच्या गटात कायरा चेतनानी यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
 
महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुस-या मानांकीत कायरा चेतनानी हीने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत सेजल भुतडाचा 6-4, 6-4 असा पराभव करुन विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 2तास चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व सामन्यात 4-4 अशी बरोबरी झाली. त्यानंतर कायराने आक्रमक खेळ करत नवव्या गेममध्ये सेजलची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील पहिल्या सेटसारखी आठव्या गेमपर्यंत पुनरावृत्ती पाहायला मिळाली. अखेर 10व्या गेममध्ये कायराने मिळालेल्या संधीचे सोने करत सेजलची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले. कायरा ही एसपी कॉलेज मध्ये अकरावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी प्रशिक्षक केदार शहा आणि अनिकेत वाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकीत निशित रहाणे याने सहाव्या मानांकीत साहिल तांबटचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. निशित हा बीएमसीसी कॉलेजमध्ये बारावी इययेत्त शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत निशित रहाणे व जय दीक्षित या जोडीने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत सार्थ बनसोडे व आझमीर शेख यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात दुस-या मानांकीत कायरा चेतनानी व सेजल भुतडा या जोडीने श्रुती नानजकर व देवांशी प्रभुदेसाई यांचा 6-2, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व 50 एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व 40 एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मातोश्री डेव्हलपर्सचे रणजीत शितोळे, निवृत्त कस्टम अधिकारी सुनिल दळवी, ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी उमेश दळवी आणि पी सुनिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत, स्पर्धा निरीक्षक लीना नागेशकर आदि मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल:(मुख्य ड्रॉ): अंतिम फेरी: मुले: निशित रहाणे (महाराष्ट्र)(1)वि.वि.साहिल तांबट (महाराष्ट्र) (6) 6-2, 6-3;
मुली:कायरा चेतनानी(महाराष्ट्र)(2) वि.वि. सेजल भुतडा( महाराष्ट्र) (4) 6-4,6-4;
 
दुहेरी: अंतिम फेरी: मुले: निशित रहाणे(महाराष्ट्र) / जय दीक्षित(महाराष्ट्र)वि.वि.सार्थ बनसोडे(महाराष्ट्र)/आझमीर शेख (महाराष्ट्र)(4) 6-3, 6-4;
मुली: कायरा चेतनानी (महाराष्ट्र)/ सेजल भुतडा(महाराष्ट्र) (2)वि.वि.श्रुती नानजकर (महाराष्ट्र)/देवांशी प्रभुदेसाई (महाराष्ट्र)6-2, 6-2.