पुणे: लष्करासह रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांना १३ लाखांचा गंडा

पुणे, दि. २ जून २०२१: लष्करासह रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने चौघांजणांना १३ लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपीने तरुणांना नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र देत फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारत कृष्णा काटे (वय ४१, रा. राजुरे, सांगोला), राजेंद्र दिनकर संकपाळ (रा. सातारा), दयानंद जाधव, बी. के. सिंग (रा. लखनौ) यांच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान गौसुद्दीन शेख (वय २१, रा. करडखेल, ता. उदगीर) याने तक्रार दिली आहे.

सलमान शेख यांची एका ओळखीच्या व्यक्तीकडून आरोपींची ओळख झाली होती. आरोपींनी शेख, शिवाजी जाधव, नागनाथ जाधव यांना लष्करात भरती करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येकी ६ लाख रूपयांची मागणी केली. त्यांच्याकडून काही आगाऊ रक्कम घेतली. पैसे दिल्यानंतर भरतीसाठी दिल्ली, झांशी, लखनौ, रांची, जबलपूर शहरांमध्ये बोलवून घेतले. त्याठिकाणी भरतीची प्रक्रिया राबविल्याचे दाखविले. त्यांना लष्करात भरती झाल्याचे नियुक्तीपत्र दिली. लष्कराच्या नावाने एक बनावट वेबसाईट करून गैरवापर केला. त्यानंतर तरुणांनी लष्करी अधिकाNयांकडे चौकशी केल्यानंतर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

चौघांना साडेतेरा लाखांचा गंडा
लष्करात भरतीसाठी पैसे घेतल्यानंतर आरोपींनी सलमान याच्या भावाला रेल्वेत तिकीट तपासणीसची (टीसी) नोकरी लावतो म्हणून ७ लाख रूपयांची मागणी केली. त्यासाठी तक्रारदार यांनी काही पैसे त्यांना दिले होते. दरम्यान, आरोपींनी आतापर्यंत चौघांना नोकरीच्या आमिषाने तब्बल १३ लाख ५० हजार रूपये घेतले आहे. आरोपींनी आणखी काही जणांस फसविले असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.