पावसाळ्याच्या पार्श्भूमीवर जिल्हा परिषदेतर्फे मुळशी तालुक्यातील गुटके गावातील १४ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर

पुणे, ६ जुलै २०२२: पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दरड कोसळणे, भूस्खलन यांसारख्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावाला भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली.

गुटके गावातील वस्तीच्या वरच्या भागातील जागेत मोठ्या जागेवर 1 फूट भेग असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी त्याठिकाणी भेट दिली असता, त्यांना खरोखरच जमीन सरकल्याचे आढळले. कठोर खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठीय प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रहिवाशांना परिषदेने गेल्या वर्षी बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित केले.
याबाबत परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,” परिषदेने फियाट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने गावचे सरपंच श्री वायकर यांनी दान केलेल्या जमिनीवर प्रत्येकी 2 खोल्या असलेली 16 घरे बांधली आहेत. याशिवाय, परिषदेतर्फे गोठा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. सौर दिवे देखील देण्यात आले आहेत. परिषदेचे क्षेत्र अधिकारी संदीप जठार यांच्या नेतृत्वाखाली हे काम संपन्न झाले.”