पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत 15 वर्षीय मानस धामणेची कडवी झुंज

पुणे, 2 जानेवारी, 2023: पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत भारताचा उभारता खेळाडू मानस धामणेने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत मायकेलला कडवी झुंज दिली. पण मानसला जागतिक क्रमवारीत 113व्या स्थानी असलेल्या मायकेल मोव्हकडून 2-6, 4-6 असा पराभवाचा सामना करावा लागला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या 15 वर्षीय मानसचे आव्हान 24 वर्षीय अमेरिकेच्या मायकेलने संपुष्टात आणले. हा सामना 1 तास 28मिनिटे चालला.

सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथ्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे बरोबरी निर्माण झाली. पाचव्या व सातव्या गेममध्ये मायकेलने सुरेख खेळ करत मानसची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्येदेखील मानसला मायकेलने कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. पहिल्याच गेममध्ये मायकेलने मानसची सर्व्हिस भेदली. सामन्यात 3-1अशा फरकाने आघाडीवर असलेल्या मायकेलने पाचव्या गेममध्ये मानसची सर्व्हिस ब्रेक केली व 4-1 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मानसने आक्रमक खेळ करत मायकेलची आठव्या व दहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. पण दहाव्या गेममध्ये आघाडीवर असलेल्या मायकेल याने आपल्या अनुभवाचा वापर करत बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची सर्व्हिस राखत हा 6-4 असा जिंकून विजय मिळवला.

सामन्यानंतर मानस म्हणाला की, सामन्यापूर्वी मला थोडे दडपण आले होते. परंतु कोर्टवर गेल्यावर मी सामना खेळण्यास सुरु केल्यानंतर माझे दडपण दूर झाले. सामन्यातील पहिलाच गुण माझ्यासाठी महत्वाचा होता आणि त्यामुळेच माझे दडपण दूर झाले. सामन्यात मला कमबॅक करण्याची देखील संधी होती. कदाचित हा सामना आणखी वेगळा होऊ शकला असता. आज मी ज्यापद्धतीने सामना खेळला, त्याबाबत मी खुश आहे आणि माझ्यासाठी हा चांगला अनुभव होता. आगामी स्पर्धेत मी माझ्या खेळात आणखी सुधारणा करेन.”

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने या पाचव्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजन जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.

अन्य लढतीत स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना याने बर्नाबे झापाटा मिरालेसचा 6-1, 7-5 असा तर, सर्बियाच्या लास्लो दजेरी याने स्लोव्हाकियाच्या पाचव्या मानांकित अॅलेक्स मोल्कनचा 6-2, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. नेदरलँडच्या टेलन ग्रीक्सस्फुर याने सातव्या मानांकित स्पेनच्या जौमी मुनारचे आव्हान 6-4, 7-5 असे संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी गट:
मायकेल मोव्ह(अमेरिका)वि.वि.मानस धामने(भारत) 6-2, 6-4;
रॉबर्टो कार्बालेस बायना(स्पेन)वि.वि.बर्नाबे झापाटा मिरालेस(स्पेन)6-1, 7-5;
बेंजामिन बोन्झी (फ्रांस)वि.वि.चुन-सिन त्सेंग(तैपेई)6-0, 6-3;
लास्लो दजेरी(सर्बिया)वि.वि.अॅलेक्स मोल्कन(स्लोव्हाकिया) [5]6-2, 6-4;
टेलन ग्रीक्सस्फुर(नेदरलँड)वि.वि.जौमी मुनार(स्पेन)[7] 6-4, 7-5;