September 24, 2025

18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत 16 संघ सहभागी

पुणे, 20 डिसेंबर, 2023: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद  स्पर्धेत शहरांतील नामांकित आयटी क्षेत्रातील 16  संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा 23 डिसेंबर 2023 पासून पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर आणि उपाध्यक्ष विजय जोगळेकर यांनी सांगितले की, 2005मध्ये अंकुर जोगळेकरचे अपघातात निधन झाले. अंकुर हा आयडीयाज अ सास कंपनी काम करत होता. त्याचबरोबर तो एक गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू देखील होता. त्याने  19वर्षाखालील संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व देखील केले होते व विदर्भच्या राष्ट्रीय संघात देखील त्याचा समावेश होता.

आयडीयाज अ सास कंपनीच्या वतीने गेली 18 वर्षे अंकुर जोगळेकरच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविणे, रोड सेफ्टी आणि ट्रॅफिकचे नियम पाळणे याबाबत जागरूकता करणे हा यामागील उद्देश आहे.

स्पर्धेत आयटी क्षेत्रातील इन्फोसिस(गतविजेता), टीसीएस(गतउपविजेता), टेक महिंद्रा, केपीआयटी, आयडीयाज, दसॉल्ट सिस्टीम, सायबेज, मर्क्स, यार्डी, अॅमडॉक्स, पबमॅटिक, एसएसअँडसी ऍडव्हेंट, मास्टरकार्ड, व्हेरिटास, डॉइश बँक आणि एफआयएस ग्लोबल हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात चार संघ अशी चार गटात विभागणी करण्यात आली असून यातील अव्वल दोन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 3 मार्च 2024 रोजी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50,000/- रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 30,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मालिकावीराला 5,000/- रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना प्रत्येकी 5,000/- अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे यावर्षी महिला क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महिला क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व  10,000/- रुपये, उपविजेत्या संघाला करंडक व 5,000/-रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.  स्पर्धेचे उदघाटन अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर, उपाध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केएस प्रशांत, वित्तीय विभागाच्या प्रमुख मल्लिका जेम्स, आयडीयाज इंडिया ऑपरेशन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे माजी संचालक विद्याकांत काला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.