18 वर्षांवरील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करून घेण्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे निर्देश

नवी दिल्‍ली, 29 मे 2021 : कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग(डीओपीटी) 18 वर्षांवरील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचा सल्ला देत आहे, असे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, पेन्शन, अणुउर्जा आणि अंतराळ आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले. कोविड19 महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ते बोलत होते.

सरकारने कोविड19 प्रतिबंधासाठी 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लसीकरणामध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे डीओपीटीच्या आस्थापना विभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले. त्याचबरोबर कोविड संसर्ग झालेल्यांची वाढती संख्या लक्षात घेता आपापल्या विभागातील कामाची गरज आणि आपल्या विभागातील संसर्गग्रस्त कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येचे नियमन करण्याचे अधिकार सचिव/ विभागप्रमुख यांना देण्यात आले आहेत. विभागांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये डीओपीटीच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. कामाच्या ठिकाणी काचेच्या पार्टिशनची आणि सरकारी गाड्यांमध्ये चालकाची आसने वेगळी करण्यासाठी प्लास्टिक शीटच्या पार्टिशनची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.