बंद फ्लॅट फोडला; १८ लाखांचा ऐवज पळविला

पुणे, २५ ऑगस्ट २०२२: शहरातील घर‌फोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी बाणेर रस्त्यावरील बहुमजली इमारतीमधील बंद फ्लॅट फोडून तब्बल १८ लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

 

तक्रारदार हे बाणेर रोडवरील एल्जीयन सोसायटीत राहतात. ते कुटूंबासह शनिवारी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी घराचा दरावाजा तोडून आत प्रवेश केला. तर लाकडी कपाटातील तब्बल १७ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार मंगळवारी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानतंर पोलिसांनी येथे धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तर, यासोबतच रास्ता पेठेतील बंद मेडिकलचे दुकान फोडून चोरट्यांनी तीन मोबाईल व रोकड चोरून नेली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अजित भोसले (वय ४४) यांनी तक्रार केली आहे. तक्रारदारांचे मेडिकलचे दुकान आहे. मध्यरात्री चोरट्यांनी बंद मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, रोकड, ३ मोबाईल आणि चार्जर चोरून नेला.