पुणे: लष्करात भरतीच्या आमिषाने २० तरूणांना गंडा, ५० ते ६० लाखांची फसवणूक

पुणे, २१/०६/२०२१: लष्करात भरती करण्याच्या आमिषाने एकाने १५ ते २० तरूणांना तब्बल ५० ते ६० लाख रूपयांचा गंडा घातला आहे. आणखी काही फसवणूकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. योगेश दत्तू गायकवाड (रा.कन्नड, संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरूणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी तरूणी मूळची आळंदी देवाची येथे राहत असून जानेवारी २०२० मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रूग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरूणीला मिळून आले होते. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरूणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरूणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी २ लाख रूपये घेतले. त्यानंतर तरूणीच्या गावातील तरूणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत ५० ते ६० लाखांची फसवणूक केली आहे.

असा करीत होता फसवणूक

आरोपी योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून पुण्यातील विविध भागात तो फिरत होता. बसस्थानकावर एकट्या तरूणींना गाठून विश्वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्यानंतर तरूणीसोंबत खोटे लग्न करून त्यांच्या कुटूंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने २ ते ३ लाख रूपये घेउन पोबरा करीत होता. अशाच प्रकार त्याने फिर्यादी तरूणीसोबत केला आहे.