पीएमपीएमएलतर्फे श्रावणातील रविवार व सोमवारी भीमाशंकरसाठी २४ तास शटल सेवा

पुणे, २ ऑगस्ट २०२२ : श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार व सोमवारी भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिर पर्यंत २४ तास शटल सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सदरच्या शटल सेवेकरीता पीएमपीएमएल च्या निगडी डेपोतील डिझेलवर धावणाऱ्या १२ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दि. ७ व ८ ऑगस्ट, दि. १४, १५ व १६ ऑगस्ट तसेच दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी (श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार व सोमवार) सदरची शटल बससेवा भाविकांसाठी २४ तास उपलब्ध असेल. दि. १४, १५ व १६ ऑगस्ट रोजी सलग सुट्टी असल्याने रविवार, सोमवार व मंगळवारी देखील शटल सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. निगडी डेपोतून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पहाटे ४ वा. सदरच्या बसेस निघतील व सोमवारी रात्री उशिरा या सर्व बसेस निगडी डेपोमध्ये परत येतील. मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथेच सर्व्हिस व्हॅन मधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच बस मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करणेकामी ब्रेकडावून व्हॅन देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

तरी श्रावण महिन्यात प्रत्येक रविवार व सोमवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिर पर्यंत पीएमपीएमएलच्या या शटल बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.