पुणे, २१ जानेवारी २०२५ : पुण्यातील सिंहगड रस्ता, धायरी, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह ग्रामीण भागातून गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जिबीएस) या दुर्मिळ व मेंदूविषयक (न्युरॉलॉजिकल) आजाराने धुमाकुळ घातला आहे. दोन वर्षाच्या मुलांपासून ६८ वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत २४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६ जण अतिदक्षता विभागात असून दोन कृत्रिम श्वसोच्छवास प्रणालीवर आहेत. या आजाराचे कारण स्पष्ट होण्यासाठी ८ रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) कडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
‘जिबीएस’ हा दुर्मिळ विकार असून तो ‘ऑटो इम्युन’ गटातील म्हणजेच स्वतःच्या शरीरावर हल्ला करणारा लक्षणांचा समूह (सिंड्रोम) आहे. तो काही संसर्गजन्य नाही किंवा तो कोणत्या एका संसर्गजन्य आजारामुळे पसरतही नाही. यामध्ये आपली प्रतिकार शक्ती ही आपल्याच शरीरातील नसांवर शत्रू समजून चुकून हल्ला करते. त्यामुळे हात पायांमधील ताकद जाते आणि त्याने रुग्णाच्या हालचालीवर मर्यादा येतात किंवा तो हालचाल करू शकत नाही. याचा जास्त परिणाम हा कमरेपासून खाली होतो. एक प्रकारे रुग्णाला अर्धांगवायू (पॅरालिसिस) होतो. परंतु दोन ते तीन आठवड्याच्या उपचारानंतर ९५ टक्क्यांहून अधिक रुग्ण बरेही होतात.
दरम्यान या आजाराचे जवळपास २४ रुग्ण दोनच आठवड्यात आढळून आल्याने तज्ज्ञांसह आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. इतक्या कमी कालावधीत या रुग्णांची अचानक संख्या वाढण्याची पुण्यात ही पहिलीच वेळ आहे. २४ पैकी सर्वाधिक १६ रुग्ण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असून यापैकी सहा रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत.
पूना हॉस्पिटल ५, श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय ४, भारती रुग्णालय ३, अंकुरा रुग्णालय औंध व सह्याद्री रुग्णालय डेक्कन येथे प्रत्येकी १ असे २४ रुग्ण दाखल आहेत.
९ ते २० जानेवारीदरम्यान हे २४ रुग्ण आढळले आहेत त्यापैकी ५ रुग्ण हे शहरातील तर उरलेले उपनगर, व ग्रामीण भागातील आहेत. दीनानाथ मंगेशकर व नवले रुग्णालयातील ८ रुग्णांचे रक्त, लघवी व शौचाचे नमुने हे तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ कडे पाठवले आहेत. तर इतरही रुग्णांच्या नमुने पाठवण्याची प्रक्रिया सूरू आहे. याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
– डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर