पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस क्रिडा स्पर्धा उत्साहात,२४१ खेळाडूंनी घेतला सहभाग

पुणे, दि. २९/०८/२०२२- पुणे व पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत सुरू असलेली ३८ वी क्रिडा स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. स्पर्धेत विविध विभागात २४१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आयकर विभागाचे मुख्य आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे उपस्थित होते.

 

स्पर्धेत पुर्व, पश्चिम विभाग, मुख्यालय आणि शाखेसह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार संघानी सहभाग घेतला होता. पुरूष व महिलांमध्ये १०० मिटर धावण्यासह पोलीस अधिकारी आणि निमंत्रिक यांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी विजय प्राप्त केला. १०० मिटर धावणे (पुरुष) गटात महेश आवाळे यांनी प्रथम क्रमांक आणि गोविंद कोळेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तर महिलांमध्ये स्नेहा धुरी यांनी प्रथम आणि सुरेखा ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

 

अ‍ॅथलेटिक्समध्ये महिला पोलीस अंमलदार स्नेहा धुरी (गुन्हे शाखा) यांनी सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान पटकाविला. तर पोलीस अंमलदार अली शेख (पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) हे अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरले. दरम्यान, फिटनेससाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत प्रवीण कुमार यांनी व्यक्त केले. क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन एपीआय विक्रम मिसाळ, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, एकता कपुर यांनी केले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आभार मानले.