पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात 242 वा लष्करी अभियंता दिन साजरा

18 नोव्हेंबर 2022: पुण्याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग-CME), महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, तसेच पुण्यातील आजी माजी सॅपर ( पायाभूत सुविधा उभारणी लष्करी अभियंते) अधिका-यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी 242 वा कोअर ऑफ इंजिनियर्स डे अर्थात लष्करी अभियंता दिन साजरा केला. कोअरच्या हुतात्मा वीरांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यासाठी, पुण्याच्या दक्षिण कमांड येथील युद्ध स्मारकात सर्व आजी-माजी अधिकाऱ्यांच्या वतीने समारंभ आयोजित करण्यात आला होता. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर अभियंते सैनिकांच्या स्मरणार्थ, लेफ्टनंट जनरल पीपी मल्होत्रा, एव्हीएसएम, व्हीएसएम, कमांडंट-सीएमई आणि लेफ्टनंट जनरल बी टी पंडीत, पीव्हीएसएम, व्हीआरसी (निवृत्त) यांनी सर्व आजी-माजी अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पांचक्र वाहिले. कमांडंट, सीएमई यांनी एक विशेष सैनिक संमेलन देखील, 17 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केले होते. युद्ध आणि युद्धेतर शांततेच्या काळात, उपयुक्त लष्करी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्यासाठी व्यावसायिक क्षमता आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक दर्जा दाखवून देण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येकाला या संमेलनात केले.

सॅपर्सचा वैभवशाली असा इतिहास, 18 व्या शतकाच्या मध्यापासूनचा आहे. 1780 हे वर्ष, कोअरचे स्थापना वर्ष म्हणून ओळखले जाते. या वर्षी कोअर मधील सर्वात जुन्या अशा, मद्रास सॅपर्सची स्थापना झाली होती. त्यानंतर आपापल्या विभागात, द बेंगाल सॅपर्स आणि द बॉम्बे सॅपर्सची स्थापना झाली. 18 नोव्हेंबर 1932 रोजी या तीनही अभियंता समुहांचे एकत्रीकरण करून कोअर ऑफ इंजिनियर्सची स्थापना करण्यात आली. म्हणून हा दिवस दर वर्षी ‘द कोअर ऑफ इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कोअर आणि सॅपर्सनी, लष्करी लढाऊ अभियांत्रिकी सेवा पुरवण्यात आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे आणि राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले आहे.

लष्करी अभियंत्यांनी, लष्करी लढाऊ अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याच्या प्राथमिक जबाबदारी व्यतिरिक्त, पायाभूत सुविधांच्या विकासात, तसेच आपत्ती निवारणात मानवतेच्या हेतूने मदत पुरवण्यात आणि डिजिटल सर्वेक्षण आणि आरेखनामध्ये अमिट छाप पाडली आहे. कॉम्बॅट इंजिनीअर्स(लढाऊ अभियंते), मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस(लष्करी अभियांत्रिकी सेवा), बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन(सीमा रस्ते संघटना) आणि मिलिटरी सर्व्हे (लष्करी सर्वेक्षण) या आपल्या चार आधारस्तंभ असणाऱ्या शाखांचा आणि या प्रत्येक कार्यक्षेत्रात सर्वोत्तम व्यावसायिक कौशल्य दाखवल्याचा, कोअर ऑफ इंजिनीअर्सला सार्थ अभिमान आहे.