October 18, 2025

24व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेस (24 ऑक्टोबर)पासून सुरुवात

पुणे, दि. 18 ऑक्टोबर 2025 – गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला 350 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरू तेगबहादुर स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने 24व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ऍम्युनिशन फॅक्टरी स्पोर्ट्स मैदान, खडकी येथे 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 या कालावधीत रंगणार आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया आणि एमजेएफ लायन रानी अहलूवालीया म्हणाले की, हि स्पर्धा ज्युनियर, वरिष्ठ, महिला गटात पार पडणार आहे. या स्पर्धेला शहरातील संघाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेचा स्तर वर्षागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे यावर्षीही शहरातील फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. यावेळी लायन्स क्लब कोथरूडचे अध्यक्ष लायन गिरीश गणात्रा, पीडीजी पीएनजेस लायन अभय शास्त्री, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन राजेश अगरवाल, एस. एस. अहलुवालिया, संत सिंग मोखा, एमजेएफ लायन रानी अहलूवालीया, अमर छाबडा, रजिंदर सिंग वालिया आदी मान्यवर उपस्थित होते.

पीडीएफएच्या मान्यतेखाली हि स्पर्धा होत असून गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया आणि लायन रानी अहलूवालीया यांच्या पुढाकाराने अनेक वर्षे या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येत असल्यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानले.

स्पर्धेत 36 संघानी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये चेतक एफसी, पुणे सिटी पोलीस, इंद्रायणी क्लब, सिग्मा एफसी, थंडर कॅट्स, के पी इलेव्हन, राहुल एफसी, अशोका इलेव्हन, जॉइंट्स ब, आर्यन्स, युके एम कोथरूड, संगम एफसी, नोझी बॉईज, बीटा एफसी, सिटी एफसी, लौकिक फुटबॉल क्लब, न्यू इंडिया क्लब, सांगवीएफसी, दुर्गा एफसी, परशुरामीयन्स, खडकी ब्लूज, साई एफसी, संगम एफसी, सनी डेज, गनर्स एफसी, फाल्कन एफसी फातिमा इलेव्हन, स्ट्रायकर्स, फिनिक्स, ब्लू स्टॅग या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे सामने बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेत एकूण 1,50,000/-. रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिकांबरोबर फुटबॉल, बॅग, पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.