पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची फसवणूक सायबर चोरट्यांकडून वैद्यकीय उपचारासाठी पैशांची मागणी

पुणे, १९/०७/२०२२: आईच्या उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्याने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चारमहिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आमदार माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा मिसाळ यांनी या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकेश राठोड याच्यासह एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माधुरी मिसाळ यांच्या मोबाईल क्रमांकावर मुकेश राठोड याने संपर्क साधला. बाणेर येथील एका रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी राठोडने केली. त्यानंतर मिसाळ यांना राठोडने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. मिसाळ यांनी तीन हजार ३ हजार ४०० रुपये पाठविले.

अशाच पद्धतीने राठोड आणि साथीदाराने आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर पूजा मिसाळ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्राथमिक तपासात आरोपींनी चार महिला आमदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याकडे गुन्हा तपासासाठी सोपविला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करत आहेत.