शिक्षण अर्धवट सोडलेल्या ४० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविले यश, लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनचे विद्यार्थ्यांना सहकार्य

पुणे, २३ जून २०२२ : शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येत, त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे पुन्हा खुली करण्याचा अनोखा कार्यक्रम ग्लोबल अपोरच्युनिटी युथ नेटवर्कच्या (जीओवायएन) युथ ईनोव्हेशन फंड या उपक्रमांतर्गत राबविला जात आहे. नुकतेच या उपक्रमाअंतर्गत ४० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

फाऊंडेशनकडे सुप्रभात महिला मंडळाच्या माध्यमातून ४० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. सुप्रभात महिला मंडळ हे शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कौशल्य प्रशिक्षण, महिला विकास आणि सक्षमीकरणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे.

याबाबत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी रेश्मा शिंदे (वय ३०, रहिवासी-बिबवेवाडी) म्हणाल्या,” मी आमच्या परिसरात घरकाम करते. माझी शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र घरच्या परिसथितीमुळे माझ्या आई – वडिलांनी माझे लवकर लग्न लावून दिले. माझ्या पतीची इच्छा होती की मी किमान १० वी पर्यंत तरी शिकावे. त्यामुळे मी पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. पण आपल्याला हे जमेल का याची मनात सतत भीती वाटत होती, कारण शाळा सोडून बरीच वर्षे झाली होती. पण माझी मुलगी नववी मध्ये शिकत आहे. मी शिकले तर तीही अधिक चांगल्याप्रकारे शिकेल हा विचार करत मी १७ नंबर चा फॉर्म भरला आणि दहावीची परीक्षा दिली. आज माझे दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा सत्त्यात उतरली आहे.”

बिबवेवाडी परिसरातच राहणाऱ्या छाया कांबळे (वय ३८) म्हणाल्या,” मला लाइटहाऊस फाऊंडेशनमधून फोन आला आणि विचारण्यात आले की, “मला दहावी पूर्ण करायची आहे का?”. मी विचार केला आणि वयाची पर्वा न करता फॉर्म भरला. याबाबत मी जेव्हा माझ्या नवऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, “आता तु शिक्षण घेऊन काय करणार?” तेव्हा मी सांगितले की, “लग्नापूर्वी माझे एक स्वप्न होते की मी भरपूर शिकावे, परंतु आर्थिक अडचणींमुळे मी शिकू शकलो नाही. पण आता मला शिकायचे आहे.” ते ऐकल्यावर माझ्या पतीनेही मला पाठिंबा दिला.
आमचे १२ जणांचे संयुक्त कुटुंब आहे. मी सर्व अभ्यास घरीच करते. पहाटे ५ वाजता उठा. सर्वांचे जेवण बनवा आणि मग मुलांना शाळेसाठी तयार करा. असा माझा दिनक्रम असतो. सुरवातीला माझ्या सासूबाई माझ्या अभ्यासाच्या विरोधात होत्या. पण जेव्हा मी 80% गुण मिळवून उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना माझा खूप अभिमान आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले.”

जीओवायएनतर्फे या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे बॉबी ज़कारिया म्हणाले,” जे तरुण शिक्षण पूर्ण करतात ते उच्च अभ्यासक्रम, चांगल्या नोकऱ्या आणि पगारवाढीसाठी पात्र ठरतात, शिवाय त्यातून तरुणांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांचे मनोबल वाढवते. जीओवायएन हे पुणे शहरातील संस्था आणि शाळांच्या सहकार्याने मोठ्या संख्येने तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्रित करत आहे. या उपक्रमाअंतर्गत लाइटहाऊसने पाठिंबा दिलेली ही अशा प्रकारची पहिली बॅच होती.”