छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान

बारामती, दि. ७ जुलै, २०२२- विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाला ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले आहे. योजनेला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली असून, कमीत कमी कालावधीत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने प्रत्येक मंडल, विभाग व उपविभाग पातळीवर एक नोडल अभियंत्याची नेमणूक सुद्धा केली आहे. हा अभियंता महावितरण, एजन्सी व ग्राहक यांच्यात समन्वय साधून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहे. लवकरच याकरिता विभागनिहाय ग्राहक मेळावे सुद्धा आयोजित केले जाणार आहेत.

बारामती परिमंडलात या क्षेत्रात एकूण ५२ एजन्सी नोंदणीकृत आहेत. त्याची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यातूनच एकाची निवड ग्राहकाला करावी लागते. या सर्व एजन्सी प्रतिनिधींची बैठक मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती येथे घेतली. या योजनेला गतीमान करण्यासाठी ही बैठक होती. यास सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे छतावरील सौर प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा राज्यात सुरु आहे. योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलावॅट क्षमतेसाठी ४० टक्के तर ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पाला २० टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे. घरगुतीमध्ये गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संस्थांनाही समाविष्ठ केले आहे. अनुदानासाठी शासनाने अंदाजे रक्कम निश्चित केली असून, प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी किंवा जास्त खर्च येऊ शकतो. यामध्ये इमारतीची उंची, बसविले जाणारे मीटर व अर्थिंगसाठी लागणारे केबल इत्यांदी खर्चामुळे बदल संभवतो. अर्ज करताना लघुदाब ग्राहकांसाठी ५०० तर उच्चदाब घरगुती ग्राहकांसाठी ५००० इतके प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

नेमका खर्च किती ? :- १ किलोवॅट करिता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या ४६८२० रुपये किंमतीच्या ४० टक्के म्हणजेच १८७२८ इतके अनुदान प्राप्त होईल. अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अंदाजे २८०९२ रुपये खर्च येऊ शकतो. प्रकल्पाची क्षमता जेवढी अधिक तेवढा प्रतिकिलो वॅटमागे येणारा खर्च कमी होतो. उदा. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या छतावर १० किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेची सौरप्रणाली बसविली तर त्याचा प्रतिकिलो वॅटचा खर्च साधारणपणे ३७०२० रुपये इतकाच येतो.

अर्ज कोठे करावा :- छतावरील सौर प्रणालीकरिता अर्ज करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी कंपनीच्या संकेतस्थळाला किंवा https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर भेट द्यावी. अर्ज करताना वीजग्राहक क्रमांक, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करुन पुढील माहिती भरावी. ज्या ग्राहकांचा मंजूर वीजभार ३ किलोवॅटपेक्षा कमी आहे. त्यांना भार वाढवून घेण्याची आवश्यकता नाही.

पाच वर्षांचा करार :- सौरऊर्जा प्रकल्पाची देखभालीची हमी ५ वर्षांची राहील. तसा करार संबंधित एजन्सी व ग्राहक यांच्यात होईल. कराराचा मजकूर ऑनलाईन उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रे डाऊनलोड करुन, व्यवस्थित भरुन अपलोड करणे गरजेचे आहे. प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे नोडल अभियंता व एजन्सी मदत करतील