पुणे: पेप्सिको इंडिया कंपनीकडून सीएसआरमधून ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर

पुणे, १५ जुन २०२१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून पेप्सिको इंडिया कंपनीच्या पेप्सिको फाउंडेशन आणि सस्टेनेबल एन्व्हार्यनमेंट अॅण्ड इकॉलॉजीकल डेव्हलपमेंट सोसायटी (सीड्स) यांच्यावतीने कॉर्पोरेट सोशल रिसिपॉन्सब्लिटी (सीएसआर) निधीतून ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

 

पेप्सिको कंपनीचे वरिष्ठ एच. आर. व्यवस्थापक श्री. दीपक औटी यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची व्हीआयपी सर्कीट हाऊस येथे भेट घेऊन ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर शिरूर लोकसभा मतदारसंघात वापरण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’ करिता सुपूर्द केले.

 

या संदर्भात खा. डॉ. कोल्हे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दोन वर्षांसाठी विकासकामांसाठीचा खासदार निधी बंद केला आहे. त्यामुळे विविध विकासकामे, कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, इंजेक्शनची उपलब्धता करण्यासाठी निधीची कमतरता होती. तसेच ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन निर्मिती प्लांटसह विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी निधीची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांसह औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

 

त्यानुसार कोविडच्या पहिल्या लाटेत ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गरजूंना धान्य किट्स, वैद्यकीय साहित्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र यावेळच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, ऑक्सिजन प्लान्ट आदी बाबींची आवश्यकता भासत होती. त्यामुळे कोविडची तिसरी लाट आलीच तर त्याचा सामना करण्याच्या तयारीचा भाग म्हणून ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आदी उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नारायणगाव, चांडोली, शिरूर ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट मंजूर करण्यात आले आहेत.

 

परंतु ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरसाठी प्रयत्न सुरू होते. त्याच प्रयत्नांना प्रतिसाद देत पेप्सिको इंडिया कंपनीच्या पेप्सिको फाउंडेशन आणि सस्टेनेबल एन्व्हार्यनमेंट अॅण्ड इकॉलॉजीकल डेव्हलपमेंट सोसायटी (सीड्स) यांच्या वतीने त्यांच्या सीएसआर निधीतून ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. ही मदत गरजू रुग्णांना दिलासादायक ठरेल असा मला विश्वास आहे. सामाजिक दायित्वाच्या जाणीवेतून मदत केल्याबद्दल सर्वांच्या वतीने पेप्सिको इंडिया कंपनीचे आभार मानतो.