लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीकडून लसीसाठी ५० लाखांचा निधी

पुणे , दि. १५/०९/२०२२ : जनावरांमध्ये लंपी हा रोग झपाट्याने वाढत चालला आहे. या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून पाऊल उचलणे गरजेचे आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे महत्वाचे आहे , त्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ५० लाखाच्या खर्चासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे.

 

लंपी रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे . आरोग्य विभागाकडून सुद्धा या रोगावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून जनावरांना लस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लसींची खरेदी करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जनावरांचे लसीकरण करून हा रोग नियंत्रणात येऊ शकतो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

 

लंपी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुंना इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारांसाठी पुरेशी औषधे आणि लसींची संख्या देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चास तातडीने मान्यता देण्यात आली आहे.लंपी नियंत्रणासाठी गरज पडल्यास जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लंपी आजारावरील लसीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी औषधांसाठी वापरण्यात यावा, असेही मंजूरी आदेशात नमूद करण्यात आले आहे.