September 24, 2025

११ ते १४ जानेवारी दरम्यान ६ व्या जपानी चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ४ जानेवारी, २०२४ : समकालीन जपानी चित्रपट आणि अॅनिमे (अॅनिमेशन) चित्रपट खऱ्या अर्थाने जपानी संस्कृतीची ओळख आपल्याला करून देतात. हीच ओळख जगाला व्हावी, या उद्देशाने जपान फाउंडेशनच्या वतीने येत्या ११ ते १४ जानेवारी दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन  या ठिकाणी ६ व्या जपानी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा जपानी चित्रपटांचा महोत्सव आयोजित होत असून यामुळे पुणेकर रसिकांना जपानी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. सदर चित्रपट महोत्सव सशुल्क असून महोत्सवाची तिकिटे पीव्हीआर अथवा बुक माय शो यांवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असतील.
गेल्या काही वर्षांमध्ये जपानी चित्रपट आणि जपानी अ‍ॅनिमे हे भारतात लोकप्रिय होताना दिसत आहेत. सदर चित्रपट महोत्सव भारतात दिल्ली, हैदराबाद, चैन्नई, मुंबई, बंगळुरू, कलकत्ता या ठिकाणी होत असतो, यावर्षी पहिल्यांदाच पुण्यात याचे आयोजन होत आहे. जपानी व्यापारी परिषद असो किंवा जपानी कला, संस्कृती या आजवर कायमच पुणेकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत याचा आम्हाला आनंद असल्याचे यावेळी महोत्सवाचे आयोजक आणि जपान फाउंडेशनचे संचालक कोजी सातो यांनी सांगितले.

‘डिटेक्टिव्ह कोनान’ हा लोकप्रिय जपानी अ‍ॅनिमे चित्रपट याबरोबरच १९७९ साली हायाओ मियाझाकी दिग्दर्शित ‘ल्युपिन द थर्ड : द कासल ऑफ कॅग्लिओस्ट्रो’ हे यावर्षीच्या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

याबरोबरच ‘अ मॅन’, ‘अ‍ॅनिमे सुप्रीमसी’, ‘इंटॉलेरन्स’, ‘मनडेज्: सी यु धिस वीक!’, फादर ऑफ द मिल्की वे : रेलरोड’, ‘डिटेक्टिव्ह कोनान: एपिसोड वन’, ‘डिटेक्टिव्ह कोनान द मुव्ही : क्रॉसवर्ड इन द एनशिएन्ट कॅपिटल’, ‘वी मेड अ ब्युटीफुल बुके’, ‘डिटेक्टिव्ह कोनान द मुव्ही: द लास्ट विझार्ड ऑफ द सेंच्युरी’ आणि ‘हिरोकाजू कोरे एडाज्’ यांसोबतच पारितोषिक विजेता चित्रपट ‘मॉन्सटर’ आदी चित्रपट दाखविले जातील. महोत्सवासाठी ग्रीक पिक्चर्स आणि कॉमिक्स वेव्ह फिल्म्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

जपान फाउंडेशनबद्दल – जपान फाउंडेशन ही संस्था जपानची एकमेव संस्था आहे जी जगभरात व्यापक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम पार पाडण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. जपानी नागरिक आणि इतर देश- प्रदेशांमधील नागरिकांमध्ये परस्पर समंजसपणा वाढवण्याच्या हेतूने आवश्यक उपक्रमांचे आयोजन देखील फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतात. कला आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, जपानी भाषेसाठीचे उपक्रम, जागतिक भागीदारी अशा तीन क्षेत्रांत फाउंडेशनचे काम चालते. फाउंडेशनचे मुख्यालय हे टोकियो येथे असून क्योटो येथील कार्यालय, २ भाषा संस्था, याबरोबरच २५ देशांमधील २६ कार्यालयांमार्फत फाउंडेशनचे काम चालते.