पिंपरी-चिंचवड शहरातील ९३ टक्के खड्डे बुजवले, प्रशासनाचा दावा

पिंपरी, १९/११/२०२२: पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हाती घेतली आहे. त्याला सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध भागांतील ९३ हून अधिक खड्डे बुजवण्यात आले आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे वाहनचालक- नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खड्डेमुक्त पिंपरी-चिंचवड’ राबविण्यात येत आहे. त्याद्वारे दि. १५ डिसेंबरअखेर शहरातील संपूर्ण खड्डे बुजवण्याचा संकल्प केला आहे. प्रशासनाने जून २०२२ मध्ये शहरातील खड्डयांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यावेळी ५ हजार ९७२ खड्डयांची नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत ५ हजार ५४६ खड्डे आतापर्यंत बुजवण्यात आले आहेत. उर्वरित ४२६ खड्डे भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना खड्डे आणि लोकेशनची माहिती कळवण्याबाबत आवाहन केले होते. शहरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली असून, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. याला भाजपा आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांची साथ मिळाल्यामुळे मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यश मिळत आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे म्हणाले की, महापालिका प्रशासन आणि आमदार लांडगे यांची शहरातील विविध प्रश्नांसदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी ‘खड्डेमुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निश्चित करण्यात आले. महापालिका प्रशासनाने ‘सारथी’ हेल्पलाईनवर नागरिकांनी खड्डयांबाबत तक्रारी कराव्यात असे आवाहन केले होते. ‘सारथी’ वर आलेल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे, असे आदेश स्वत: आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

महापालिका शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले की, पावसाळा लांबल्यामुळे खड्डे बुजवण्यात विलंब झाला. सध्या डांबराचे प्लँट सुरू झाले आहेत. त्यानंतर डांबरमिश्रित खडीने रस्ते योग्य रितीने दुरूस्त केले जात आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. प्रशासनाकडून ‘सारथी’ हेल्पलाईन आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.

**
आमदार जगताप, लांडगे यांची स्वतंत्र यंत्रणा…
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदार संघातील खड्डे बुजवण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. तसेच, चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वयीत झाली आहे. विशेष म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे संभाव्य उमेदवार कामाला लागले असून, नागरिकांचाही या मोहीमेत लक्षणीय सहभाग दिसत आहे.

“नागरिक- प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयुक्तपणे ‘खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळा काही दिवस लांबल्यामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत होता. या मोहीमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याबाबत सतर्क नागरिकांचे आभार मानायला हवेत. तसेच, प्रशासनानेसुद्धा जबाबदारीने तात्काळ खड्डे बुजवले पाहिजेत, अशा सूचना केल्या आहेत.” – शंकर जगताप, माजी नगरसेवक तथा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी, भाजपा.