पुणे, १९ एप्रिल २०२५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाजवळील चौकाजवळून एका मुलीला अज्ञात व्यक्ती चारचाकी गाडीत घालून पसार झाल्याची घटना उघडकीस झाली आहे. मात्र, यावेळी त्याच्याबरोबर असणाऱ्या दोन साथीदारांना पकडण्यात यश आले असून संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परंतु यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चित्रपटातील एखाद्या थरारक सीन प्रमाणे ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. संबंधित विद्यार्थिनीचे अपहरण तर केले नाही ना अशी भीती व्यक्त केले जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्र विचित्र घटनांमुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याचप्रमाणे मुलींची छेडछाड केल्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. त्यात आता एका मुलीला अज्ञात व्यक्ती चारचाकी गाडीत घालून पसार झाल्याचे समोर आले आहे.
तर अशी घडली ही घटना…
विद्यापीठाच्या मराठी विभागाजवळील चौकात एक चार चाकी गाडी उभी होती. या गाडीत एक मुलगी रडत होती. हे पाहून विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. सुरक्षा कर्मचारी गाडी जवळ येत असल्याचे पाहून रडत असलेल्या मुलीला घेऊन एक अज्ञात व्यक्ती गाडी घेऊन तेथून पसार झाला. मात्र, त्याच्याबरोबर असणारे दोन तरुण हे पाहून पळत सुटले. संबंधित तरुणांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चतुःश्रृंगी पोलीस या घटनेचा तपास करत असून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाठलाग करून पकडलेले दोन तरुण सांगवी व औंध परिसरातील असून त्यातील एका तरुणाची बॅग व मोबाईल अज्ञात व्यक्तीच्या चारचाकीत राहिले आहे. या तरुणांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच गाडीत रडत असलेली मुलगी विद्यापीठातील विद्यार्थिनी आहे किंवा नाही, याबाबतही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :
“मागील दोन महिन्यांत विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठात एक व्यक्ती विद्यार्थिनी समोर अश्लील कृत्य करताना सापडला, दारू आणि अमली पदार्थ वसतिगृहात सापडले. तर आता चक्क एका विद्यार्थिनीला चारचाकीत घालून अज्ञात विद्यापीठातून फरार झाले. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या घटना पहाता सुरक्षा विभाग अपयशी ठरला आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना कराव्यात. अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभविप) तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा यावेळी अभविपचे शिवा बारोळे यांनी दिला.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान