पुणे, ३० एप्रिल २०२५ः सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (ता. १) सकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ होणार आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम राजाराम पूल येथे होणार आहे. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजता ठेवण्यात आल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “एवढ्या सकाळी कुठे कार्यक्रम असतो का?” असा सवाल त्यांनी केला आहे. त्यावर अजित पवार यांनी “तुमची काय तक्रार असेल तर ते तुमच्या साहेबांशी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोला.” असे सुनावत ठरलेल्या वेळेस कार्यक्रम होईल हे स्पष्ट केलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार हे दरवेळेस सकाळच्या कार्यक्रमांना प्राधान्य देतात. सकाळी सहा वाजता, सात वाजता त्यांचे अनेक विकास कामांच्या प्रकल्पाचे उद्घाटन यापूर्वी देखील झालेले आहे. त्याचप्रमाणे आता या उड्डाणपुलाचे उद्घाटन होत असताना त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच भाजपला शक्ती प्रदर्शन करण्याची संधी नाही हे समजल्यामुळेच अजित पवार यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण अजित पवार यांच्यापुढे भाजपच्या नेत्यांचे काहीही चालले नाही.
विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या उड्डाणपुलाची २१२० मिटर लांबी असून, रुंदी ७.३ मिटर इतकी आहे. हा पूल ६० पिलरवर उभा करण्यात आला आहे. या उड्डाणपुलावरील वाहतूक सुरु झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. राजाराम पूल ते वडगाव बुद्रूक हे अंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटात पार करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे किमान २० मिनिटे प्रवास कमी होणार आहे.
लोड टेस्ट यशस्वी
या उड्डाणपुलावर एकच पिलरवर दोन्ही बाजूने वाहतूक होणार आहे. त्यामुळे लोड टेस्ट घेण्यात आली. यात अवजड वाहने गेल्यानंतर गर्डर किती वाकतो, त्यानंतर पूर्वस्थितीत किती येतो हे तपासले जाते. या ७० तासाची चाचणी पूर्ण झाली असून, त्यात पूल खुला करण्यास हरकत नाही असा अभिप्राय देण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी दिली.

More Stories
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन