September 12, 2025

पुणे : सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य निर्णय घेतील – नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

पुणे, १२ मे २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर सोडल्याची माहिती समोर आल्यानंतर, यावर प्रतिक्रिया देताना गोऱ्हे म्हणाल्या की, “पवार साहेबांचं मत वेगळं, इतरांचं मत वेगळं आणि सुप्रिया सुळे यांचं स्वतःचं मत वेगळं असू शकतं. त्या काय निर्णय घेतील, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मात्र आम्ही त्यांच्या हितचिंतक आहोत आणि त्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी योग्य पाऊल उचलेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

या पत्रकार परिषदेत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या ‘अहिल्या संकल्प दौऱ्या’चीही माहिती दिली. 15 ते 17 मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम होणार असून, यात शिवसेनेचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. तसेच पुण्यात उद्या पदाधिकारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेला खासदार श्रीकांत शिंदे आणि आनंदराव अडसूळ उपस्थित राहणार आहेत.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, परराष्ट्र धोरण ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. मात्र, विरोधी पक्षांनी भूमिका मांडण्याचा हक्क राखला असून, लोकशाहीत त्या भूमिकेची नोंद घेतली जाईल.

‘लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने गोऱ्हे म्हणाल्या की, जर महिलांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात असेल, तर तो निर्णय स्वागतार्ह आहे. अजित पवार यांच्याकडून असा विचार होत असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करू.