November 2, 2025

मुलींची बाजी, कोकणचा दबदबा, दहावीचा निकाल ९४.१० टक्के, नागपूर सर्वात मागे

पुणे, १३ मे २०२५: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. यंदा सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९८.८२ टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के नोंदवण्यात आला आहे. संपूर्ण राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून तो मागील वर्षीच्या तुलनेत १.७१ टक्क्यांनी कमी आहे.

या परीक्षेत राज्यभरातून १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १४,८७,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे, खाजगी विद्यार्थ्यांचा ८०.३६ टक्के आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३९.४४ टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका आहे. एकूण निकालाचा विचार करता मुलींचा निकाल ९६.१४ टक्के असून मुलांचा निकाल ९२.३१ टक्के आहे, म्हणजेच मुलींनी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी अधिक यश मिळवले आहे.

या परीक्षेत एकूण २३,४८९ शाळांनी भाग घेतला असून त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा राज्यभरातून २११ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागातील असून तिथे ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. पुणे विभागातून १३, कोल्हापूर १२, अमरावती ११, कोकण ९, मुंबई ८, संभाजीनगर ४०, नागपूर ३ आणि नाशिक विभागातून २ विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे. यंदा चार विद्यार्थ्यांचे निकाल तांत्रिक कारणास्तव राखून ठेवण्यात आले आहेत.

विभागवार निकाल पाहता कोकण विभागाने ९८.८२ टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे, तर कोल्हापूर विभागाचा निकाल ९६.८७ टक्के, मुंबईचा ९५.८४ टक्के, पुणेचा ९४.८१ टक्के, नाशिकचा ९३.०४ टक्के, अमरावतीचा ९२.९५ टक्के, संभाजीनगरचा ९२.८२ टक्के, लातूरचा ९२.७७ टक्के आणि नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे.

राज्यातून एकूण २८५ विद्यार्थी हे काठावर म्हणजेच ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी मुंबई (६७) आणि नागपूर (६३) विभागात आहेत. कोकण विभागातून मात्र एकाही विद्यार्थ्याचा निकाल काठावर लागलेला नाही.