September 12, 2025

‘जनता दरबार’च्या माध्यमातून आमदार बापूसाहेब पठारे नागरिकांच्या सेवेत

पुणे, १५ मे २०२५: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुढाकारातून पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड भागातील नागरिक बांधवांसाठी ‘जनता दरबार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिवाजीनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी याचे आयोजन केले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी तात्काळ सोडविल्या गेल्या आहेत. दरम्यान नुकतेच पार पडलेल्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. विविध भागातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी दरबारात हजर होते. यातल्या बहुतांशी समस्यांचे निराकरण जागेवरच करण्यात आले, तर काही समस्या संबंधित विभागांकडे सोपविण्यात आल्या.

जनता दरबारच्या माध्यमातून बोलताना पठारे म्हणाले, “हा उपक्रम नागरिक बांधवांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू केला आहे. यातून जास्तीतजास्त समस्या सोडवण्याचा मानस आहे. ज्या कारणासाठी नागरिकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, त्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असून त्यांच्या मतांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.”

पठारे यांनी नागरिकांना जनता दरबारात सहभागी होऊन आपल्या समस्या निःसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन ही दिले.