September 12, 2025

तुर्कीवर बहिष्कार घातलाच पाहिजे, हेच खरे देशभक्तीचे चिन्ह- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, १५ मे २०२५: जम्मू काश्मिर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात तुर्कस्थानने पाकिस्तानची बाजू घेतली. पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध लोकांना पाकिस्तानने पाठीशी घातलेल्या दहशतवाद्यांनी मारले. अशा पाकिस्तानची साथ देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार व त्यावर बंदी घातलीच पाहिजे. दरम्यान ज्यांनी ही भूमिका घेतली आहे त्यांचे स्वागत करत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील यशदा येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. तुर्की विरोधात सध्या देशभरात बायकॉट तुर्की हा ट्रेंड सुरू असून याची सुरुवात पुण्यातील मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान आता पाकिस्तानच्या नंबरवरून एका व्यापाऱ्याला धमकी आली आहे. याबाबत शिंदे म्हणाले, “पुण्यातील ज्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदवर बंदी घातली आहे त्यांचे अभिनंदन करतो.हे देश भक्तीच लक्षण आहे. ज्या व्यापाऱ्यांना पाकिस्तान मधून धमकी येत आहे त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची पोलिस यंत्रणा सक्षम असून अश्या देशभक्तांवर आच येऊ देणार नाही.”

नगर विकासाच्या माध्यमातून यशदामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त नगरपालिका अध्यक्ष स्वतः उपस्थित राहणार आहेत. शहरातील अडचणी, धोरणे आणि भूमिका, नवीन नियम, विकास आराखडा आणि शहर विकास याबाबत भर दिला जाणार आहे. राज्यातील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील आणि शहरातील माहिती सांगतील आणि एकूणच नागरिकांच्या हितासाठी या मार्गदर्शन शिबिरात संवाद साधण्यात येणार आहे.

एकत्र निवडणूकीचा महायुतीचा सूर-
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुकाबाबत शिंदे यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असून निवडणूक आयोग त्यावर काम करत आहे. आम्ही महायुतीमध्ये लोकसभा, विधानसभा लढलो आणि मोठ्या मताधिक्याने जिंकलो. आता स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत.”

भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम-
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राज्यभर भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी व लष्कराच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तसेच देशासाठी ठोस निर्णय घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले.