October 31, 2025

तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्याला पाकिस्तानची धमकी

पुणे, १५ मे २०२५: भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण स्थिती असतानाच, पुण्यातील एका व्यापाऱ्याला पाकिस्तानकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्केटयार्ड येथील सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कीवरून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतल्यानंतर ही घटना घडली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्यात २५ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर केले. यासाठी भारताला अनेक देशांचा पाठिंबा मिळत असताना तुर्कीने मात्र पाकिस्तानला समर्थन दिले. या पार्श्वभूमीवर ‘बॅन तुर्की’ हा ट्रेंड देशभर पसरत आहे. पुण्यात या मोहिमेची सुरुवात झाली ती मार्केटयार्ड मधून. जेथे व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदाची विक्री थांबवली. यामध्ये सुयोग झेंडे यांनी आघाडी घेतली होती.

सुयोग झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९:१३ वाजता पाकिस्तानमधून सात वेळा फोन कॉल आले, त्यानंतर एक व्हॉइस मेसेजही मिळाला. या मेसेजमध्ये त्यांना धमकी देण्यात आली आणि “तुम्ही भारतीय आमचं काहीच करू शकत नाही,” असे सांगितले गेले.

झेंडे म्हणाले, “बॅन तुर्की ही मोहिम पुण्यातून सुरू झाली आणि देशभरातून त्याला प्रतिसाद मिळाला. आज जे घडलं ते आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न आहे, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही मागे हटणारे नाही.”

ते पुढे म्हणाले की, याप्रकरणी लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली जाईल.