पुणे, १६ मे २०२५: पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वतंत्र लढवावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार निवडणुका होतील. त्यामध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा असणार आहे असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेत मोहोळ यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्याच्या आत घ्या असे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने ही निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका आता पुढील काही महिन्यात पार पडणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पुण्याची प्रभाग रचना नव्याने होणार की २०१७ ची प्रभाग रचना कायम राहणार? समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र प्रभाग असणार का? यासह अनेक प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये असून त्यावरून संभ्रम आहे. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी यापूर्वी स्पष्ट केले. पण त्यामुळे शहर भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुणे शहरात भाजपची ताकद चांगली आहे, २०१७ मध्ये ९९ नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची असल्यास १०५ जागा सोडून उर्वरित जागांवर महायुतीची चर्चा करावी अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. त्याअनुशंगाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मोहोळ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस पुण्यात होते. त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढविणार आहोत. पुण्यात कशी निवडणूक लढवायची याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. महापालिका निवडणुकीत निवडून येण्याचा निकष लावला जाणार आहे.
More Stories
Pune: कोंढवा खुर्दमध्ये १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा
Pune: रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमवेत पाहणी
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त