पुणे, १६ मे २०२५: पुण्यात गेल्या काही वर्षांत अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाला योग्य ती काळजी घेण्याचे आणि कामे गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पार पाडण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी आयोजित बैठकीत मोहोळ यांनी स्पष्ट सांगितले की, जे ठेकेदार कामांमध्ये हलगर्जीपणा दाखवतील किंवा अपेक्षित कामगिरी करणार नाहीत, त्यांना थेट काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच, संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
ही आढावा बैठक महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाली.
मोहोळ म्हणाले, “चेंबर स्वच्छता, अतिक्रमण हटवणे, नाले रुंदीकरण यासारख्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे. पावसामुळे नागरिकांना त्रास होतो अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. शहरात एकूण ८७५ किमी लांबीचे नाले असून, त्यांची योग्यरीत्या तपासणी सुरू आहे.”
यंदा महापालिकेने नालेसफाईसाठी २३ आणि इतर पावसाळी कामांसाठी १५ निविदा काढल्या आहेत. काही ठेकेदार काम न करता फक्त निविदा घेऊन बसतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता अशा ठेकेदारांवर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोहोळ यांनी यावेळी पुण्यातील पूरप्रवण क्षेत्रांबाबतही माहिती दिली. “पूर्वी शहरात ११७ क्रॉनिक स्पॉट्स होते, आता २२ गावे शहरात समाविष्ट झाल्याने ही संख्या २०१ झाली आहे. यातील ११७ ठिकाणी काम पूर्ण झाले असून उर्वरित ८४ ठिकाणी काम सुरू आहे. उर्वरित ३९ ठिकाणी यंदा काम होऊ शकणार नसले तरी तात्पुरते उपाय केले जातील,” असे ते म्हणाले.
मोहोळ पुढे म्हणाले, “२०१९ मध्ये आंबील ओढ्याला पूर येऊन मोठी आपत्ती ओढवली होती. त्यानंतर कात्रज ते दत्तवाडी दरम्यान नाल्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती झाली. त्यामुळे आता ती परिस्थिती निर्माण झालेली नाही.”
महापालिकेत नगरसेवक नसतानाही आमदार आणि खासदारांच्या समन्वयातून कामे सुरू आहेत. “प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र मान्सूनपूर्व रिपोर्ट तयार करून त्याचा एकत्रित आढावा घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती केली जाईल आणि नियोजित कामे न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,” असेही मोहोळ यांनी सांगितले.
महापालिकेने अतिक्रमणविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी योग्यरीत्या करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. “राज्य आणि केंद्र सरकारकडून मंजूर झालेला निधी लवकरात लवकर महापालिकेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
महायुती म्हणून निवडणुकीची तयारी सुरू – मोहोळ
आगामी महापालिका निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार तयारी सुरू असून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारी वाटप केली जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार