September 12, 2025

पुणे: राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, २३ मे २०२५: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आज (२३ मे) वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज दुपारी पुणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे, बहीण करिष्मा हगवणे यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायालयात झालेल्या युक्तिवादात न्यायालयाने या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत कस्पटे यांचे वकील शिवम निंबाळकर म्हणाले की आज आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयात आणण्यात आले आणि या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. “आज पहिलीच पीसी असल्याने पोलिसांकडून काही तपास करने बाकी आहे तसेच काही मुद्देमाल जप्त करने देखील बाकी आहे. तसेच त्यांना कोणी कोणी मदत केली याचा देखील तपास करने बाकी आहे,” असे निंबाळकर यांनी सांगितले.

निंबाळकर यांनी स्पष्ट केले की सदर युक्तिवाद यावेळी आज न्यायालयात करण्यात आला आणि न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.