September 12, 2025

Pune: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील गळालेल्या वन्यप्राण्यांच्या शिंगांचे नियमानुसार नष्टीकरण

पुणे, 27 मे 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज येथे हरिणवर्गीय वन्यप्राण्यांच्या नैसर्गिकरीत्या गळून पडलेल्या शिंगांचे नियमानुसार व सन्मानपूर्वक नष्टीकरण करण्यात आले. ही कार्यवाही “Wildlife Disposal of Wild Animal Article Rules, 2023” अन्वये, पुणे महानगरपालिकेच्या विनंतीवरून व उपवनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कार्यवाही दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता संग्रहालय परिसरात पार पडली. या कार्यवाहीसाठी उपवनसंरक्षक (प्रा.) तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल रूपनवर (खेड शिवापूर), वनरक्षक गायकवाड, मंडल अधिकारी सचिन चव्हाण, संचालक डॉ. राजकुमार जाधव, नगरसेवक महेश कदम आणि मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे हे उपस्थित होते.

प्राणी संग्रहालयात सांबर, चितळ आणि भेकर या हरिणवर्गीय प्रजातींच्या एकूण १७६ गळालेल्या शिंगांचे संकलन करण्यात आले होते. या शिंगांचे प्राणी संग्रहालयातील ज्वलनशील वायू आधारित दहिनीच्या सहाय्याने सुरक्षित आणि नियमानुसार नष्टीकरण करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया रीतसर पंचनामा व व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे पारदर्शकपणे पार पाडण्यात आली असून, त्याचे नोंदीकरण व आवश्यक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

सदर कार्यवाहीसाठी वनविभागाच्या आदेशानुसार उप वनसंरक्षक, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली वरील उल्लेखित समिती गठीत करण्यात आली होती वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अवशेष योग्य पद्धतीने आणि कायद्यानुसार नष्ट करणे ही पर्यावरणीय तसेच प्रशासकीय दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारची नियमानुसार व पारदर्शक कार्यवाही सर्वच प्राणी संग्रहालयांमध्ये वेळोवेळी राबवली जावी, असे वनविभागाचे स्पष्ट मत आहे.

ही कार्यवाही वन्यजीव सन्मानाने हाताळण्याच्या, कायद्याचे पालन करण्याच्या आणि गैरवापर रोखण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.