September 12, 2025

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरण : आमच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोळे उडवणे चुकीचे – कस्पटे कुटुंबीयांचा निषेध

पुणे, २८ मे २०२५ सासरच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी शशांक हगवणे प्रकरणात आज न्यायालयात सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. या आरोपांवर तिचे चुलते मोहन कस्पटे आणि मामा उत्तम भैरट यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. “आमचं न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्या मुलीच्या चारित्र्यावर जे शिंतोळे उडवले जात आहेत, ते पूर्णपणे खोटे आणि नीच पातळीवरचे आहेत,” असा स्पष्ट आरोप कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे.

उत्तम भैरट म्हणाले, “आमची मुलगी गेली असून आम्हाला प्रचंड दुःख आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तिच्यावर आरोप करणे ही नितांत खालची कृती आहे. आम्ही स्वतः साक्षी आहोत की हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी मागितली होती. ते आज त्याचा निषेध न करता उलट आमच्याच मुलीला दोषी ठरवत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “१६ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही करिश्मा हगवणेला फोन करून बाळ आई-वडिलांकडे पाठवा, असं सांगितलं. मात्र त्यांनी बाळ आमच्याकडे दिला नाही. उलट राजेंद्र हगवणे यांच्या भावाने फोन करून सांगितलं की बाळ रडत आहे, त्याला घेऊन जा. तेव्हा आम्ही जाऊन बाळ आणलं.”

त्यांनी असाही दावा केला की, “वैष्णवीचं प्रेमप्रकरण हगवणे कुटुंबाला मान्य नव्हतं आणि त्यांनी तिची दोन स्थळं मोडली. म्हणजेच त्यांना मुलीपेक्षा तिच्या पैशांतच अधिक स्वारस्य होतं.”

चुलते मोहन कस्पटे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “लग्नाच्या वेळी हगवणे यांनी एवढ्या मोठ्या मागण्या केल्या की आम्हाला बिल्डरकडून अ‍ॅडव्हान्स रक्कम उचलावी लागली. ५१ तोळे सोनं आणि गाडी आम्ही दिली. आता ते सगळं नाकारत आहेत. त्यांची ही भूमिका खोटेपणाची आहे.”

“आरोपी हा आरोपीच असतो, गुन्हेगार कधीच गुन्हा कबूल करत नाही,” असे म्हणत कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर उडवण्यात आलेल्या शिंतोळ्यांचा निषेध केला आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.