September 12, 2025

पुणे महापालिका आयुक्तांच्या निर्णयांची चौकशी करा – शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

पुणे, २९ मे २०२५: महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिकेत घेतलेल्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांची चौकशी करा, असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

दीड वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांची राज्य सरकारने पदोन्नतीने पुणे महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केली. या दीड वर्षांच्या कार्यकाळात पुणे महापालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना आणि आवश्यकता नसताना हजारो कोटी रुपयांचेकानावश्यक निविदा काढून अनेक चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. भोसले यांच्या नियुक्तीपासून दिनांक २९ मे २०२५ पर्यंत त्यांनी घेतलेल्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी, अशीही मागणी जगताप यांनी केली आहे.

एखाद्या अधिकाऱ्याच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर मावळत्या अधिकाऱ्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा संकेत आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्त पदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झालेली असतानाही मावळते आयुक्त डॉ. भोसले यांनी सर्व संकेत पायदळी तुडवत स्थायी समिती तथा मुख्य सभेच्या तातडीच्या बैठका आयोजित करून शेकडो कोटी रुपयांच्या निविदा मान्य केल्या आहेत, असे जगताप यांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या दक्षता समितीने आक्षेप घेतलेल्या प्रकरणांनाही त्यांनी मान्यता दिली आहे. या सर्व नियमबाह्य गोष्टींना पायबंद घालण्यासाठी डॉ. भोसले यांनी मागील महिनाभरात घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी तथा त्या सर्व निर्णयान स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.

याबाबत लोकयुक्ताकडेही तक्रार दाखल करण्यात आली असून, चौकशी न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा जगताप यांनी दिला आहे.