पुणे, ३ जून २०२५: पावसाळ्यात नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) एकता नगरीचा पूरापासून बचाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता सोसायटीभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास पाठविला आहे.
मागील वर्षी खडकसावसला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील निळ्या पूररेषेत असलेल्या एकता नगरीसह परिसरात पूराचा फटका बसला होता. नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन एकतानगरीचे पूनर्वसन करण्याची घोषणा दिली होती. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल पाठविण्याचे आदेशही देण्यात आले होते. अहवाल तयार करण्यात आला, मात्र त्यामध्ये पुनर्वसनाचे काही पर्याय सुचविण्यात आले होते. मात्र संबंधित पर्यायही तांत्रिक बाबींमध्ये अडकून पडले. या पार्श्वभूमीवर महापालिकेने एकता नगरीचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय पुढे आणला आहे. यापूर्वी कामगार पूतळा, मंगळवार पेठ झोपडपट्टी, पाटील इस्टेट झोपटपट्टी, विश्रांतवाडी येथील शांतिनगर झोपडपट्टी येथे संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्याच धर्तीवर एकता नगरी येथेही संरक्षक भिंत उभारण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे.
“एकता नगरीला बसणारा पुराचा फटका कमी करण्यासाठी नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. ‘ .पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त.
जलसंपदाच्या नियंत्रण कक्षात महापालिकेचा अधिकारी
जलसंपदा विभागाने मागील वर्षी पावसाळ्यात मुठा नदीमध्ये अचानक पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका नागरिकांना बसला होता. यापुढे असा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात महापालिका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडतानाची अद्ययावत माहिती महापालिकेस मिळणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार