September 12, 2025

Pune: खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करा – नवलकिशोर राम

पुणे, ३ जून २०२५: “शहरातील बेकायदा होर्डिंगबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले जाईल, तसेच धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई केली जाईल’ असा इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला आहे. याबरोबरच शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आयुक्त राम यांनी अग्निशामक दलास दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, मागील आठवड्यात धानोरी येथे बेकायदा होर्डिंग कोसळले होते. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडत असतानाही, महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंगकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच संबंधित विभागाने संपूर्ण शहरात अवघे २० बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा केला होता.

नवलकिशोर राम यांनी आयुक्तपदाची शनिवारी सूत्रे स्विकारली. सोमवारी त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. होर्डिंगबाबत विचारेल्या प्रश्‍नाबाबत ते म्हणाले, “बेकायदा होर्डिंगबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच बेकायदा होर्डिंगचे सर्वेक्षण करून बेकायदा व धोकादायक होर्डिंग तातडीने काढले जाईल.’

अग्निशामक दलासमवेत घेतलेल्या बैठकीमध्ये राम यांनी रुग्णालयाच्या फायर ऑडीटबाबत विचारणा केली, त्यावर त्यांना महापालिकेच्या रुग्णालयाचे ऑडीट झाले आहे, तर खासगी रूग्णालयाचे ऑडीट अद्याप झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. त्यावर नवलकिशोर राम यांनी शहरातील १५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या रुग्णालयांचे फायर ऑडीटची तपासणी करा. ज्या रुग्णालयांनी अद्याप ऑडीट केलेले नाही किंवा ज्या रुग्णालयाच्या अग्निशामक यंत्रणेमध्ये त्रुटी आहेत, त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्याचेही आदेश दिले.

महापालिका घेणार धोकादायक भिंतींची माहिती
बांधकाम प्रकल्प किंवा इमारतीच्या भिंती पावसाळ्यामध्ये कोसळण्याच्या घटना घडतात. काही वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या दोन घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील धोकादाय भिंतींची माहिती घेतली जाणार असल्याचे राम यांनी सांगितले.