September 12, 2025

Pune: भाजप कार्याध्यक्षांनी महापालिका निवडणुकीचा निर्णय ढकलला केंद्रातील नेत्यांवर

पुणे, ३ जून २०२५ : “महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढायची किंवा स्वबळावर याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाईल. त्यानुसार त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल. कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना, मतदार नोंदणीमध्ये अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.’ असे भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

भाजपकडून पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी बाणेर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत, शहरांमध्ये पायाभूत सोई सुविधा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत फडणवीस यांच्या आदेशानुसारच कार्यकर्ते काम करतील, फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेते महायुती किंवा स्वबळावर निवडणूक लढायची याबाबत निर्णय घेतील.’

चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील ११ वर्षात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात चौथ्या स्थानावर आणले, लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. रस्त्यांसह रेल्वेचे जाळे व्यापक केले, पायाभूत सोई सुविधा वाढविल्या आहेत. मोदी यांनी केलेला संकल्प सिद्धीस नेण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांची आहे. जागतिक योग दिन, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण करणे अशा कार्यक्रमाद्वारे आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जात आहोत. कॉंग्रेसने आणलेल्या आणीबाणीचा २५ जून हा दिवस काळा दिवस आहे, त्यांनी संविधानाचा अपमान कसा केला, हे आम्ही आता लोकांना सांगणार आहोत.’