November 6, 2025

पुणे: लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन, कुटुंबीयांच्या हस्ते होणार अभिषेक

पुणे, ४ जून २०२५: पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महाल परिसरात, शुक्रवार दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा अखिल भारतीय शिव महोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि इतर शिवप्रेमी संघटनांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन – ६ जून १६७४, किल्ले रायगडवर पार पडलेला, स्वराज्याच्या स्थापनेचा स्मरणरूप सोहळा म्हणून ओळखला जातो. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांच्या स्वप्नातील स्वराज्य साकार करणाऱ्या या महापुरुषाचा राज्याभिषेक दरवर्षी लाल महालात स्मरणात ठेवला जातो. गेले अकरा वर्षांपासून शिवप्रेमींनी या ऐतिहासिक ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन सातत्याने केले आहे.

यावर्षी कोणत्याही सेलिब्रिटी किंवा नेत्याला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित न करता, समाजातील अन्यायग्रस्त कुटुंबियांना या सोहळ्याचा मान देण्यात येणार आहे. हुंडाबळी प्रकरणातील स्मृतीशेष वैष्णवी हगवणे यांचे पालक, बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच स्मृतीशेष संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जगदाळे व गणबोटे कुटुंबातील सदस्य यांच्याच हस्ते राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.

शिवरायांचे बालपण आणि जिजाऊ माँसाहेबांचे वास्तव्य लाभलेल्या लाल महालात, गडकोट ट्रेकर्सच्या कैलास वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश इंगवले, मंदार बहिरट, रोहित तेलंग आणि युवराज ढवळे यांनी १२ मावळातील पवित्र नद्यांचे व गडकिल्ल्यांवरील पाण्याचे जल संकलित करून आणले आहे. या पवित्र जलाने शिवराज्याभिषेक केला जाईल. तसेच श्री क्षेत्र देहू येथून आणलेल्या इंद्रायणी नदीच्या पवित्र जलाने पंचामृत आणि पुष्पांजली अभिषेक केला जाणार आहे.

या ऐतिहासिक आणि पावन सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन समितीच्या वतीने विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, विराज तावरे आदींनी केले आहे.