November 5, 2025

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाचा मोठा निर्णय; विवाह सोहळ्यांसाठी आचारसंहितेची घोषणा

पुणे, ४ जून २०२५: वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने विवाह सोहळ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आचारसंहिता जाहीर केली आहे. या निर्णयामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले आहेत.

या आचारसंहितेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) हुंडा देणार नाही व घेणार नाही.
२) हुंडा घेणाऱ्या कुटुंबाशी समाजात ‘रोटी-बेटी’ व्यवहार केला जाणार नाही. अशा समाजातर्फे बहिष्कार करण्यात येईल.
३) सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यास, माहेरचे लोक ठामपणे मुलीच्या पाठीशी उभे राहतील.
४) विवाह सोहळे कोणतेही भपकेबाज प्रदर्शन न करता साधेपणाने आणि वेळेवर पार पाडले जातील.
५) मानपानाचे सामाजिक प्रदर्शन होणार नाही. ‘जावई मान’सारख्या गोष्टी कौटुंबिक पातळीवर होतील.
६) सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य दिले जाईल.
७) फक्त एकच व्यक्ती आशीर्वादाच्या स्वरूपात भाषण करेल.
८) विवाह कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल.
९) अनावश्यक खर्च टाळून, नवविवाहित जोडप्याच्या नावाने एफडी करण्यात येईल आणि काही रक्कम गरजवंतांना मदतीसाठी दिली जाईल.
१०) वरातीत कर्णकर्कश डीजे आणि अश्लील नृत्य बंद केले जातील; तसेच प्रदूषण निर्माण करणारे फटाके वाजवले जाणार नाहीत.
११) प्री-वेडिंग शूट टाळले जातील.
१२) विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने समान प्रमाणात उचलावा.