September 12, 2025

पुण्यात नाट्यगृहात प्रेक्षकाच्या कपड्यांत उंदीर शिरल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे, ४ जून २०२५: पुण्याच्या कोथरूड येथील प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी रात्री ९.३० वाजता एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. या उंदराने प्रेक्षकाला चावल्याने त्या महिलेला डॉक्टरांकडून तातडीने इंजेक्शन घेण्यास भाग पडले.

घटनेवेळी नाटक सुरू असतानाच उंदीर प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये शिरल्याचे लक्षात आले. प्रेक्षकाने प्रसंगावधान दाखवत कोणताही गोंधळ न करता नाट्यगृहाबाहेर जाऊन स्वच्छतागृहाकडे धाव घेतली. उंदराला बाहेर काढण्यासाठी १५-२० मिनिटे प्रयत्न सुरू राहिले. या अनिष्ट घटनेमुळे त्या महिलेला नाटक पाहण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला आणि ती थेट घरी गेली.

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी घटनेची तातडीने दखल घेतली असून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी याबाबत सांगितले की, “नाट्यगृहात अशी घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील इतर नाट्यगृहांमध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी देखील कठोर खबरदारी घेतली जाईल.”

महापालिकेने पुढील काळात नाट्यगृहांची स्वच्छता व सुरक्षिततेसंबंधी तपासणी अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.