पुणे, ११ जून २०२५ : यंदा जवळपास ३५ वर्षांनंतर मे महिन्यातच महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री झाली होती. मे अखेरीस काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र जूनच्या सुरुवातीला पावसाने काहीशी उघडीप घेतल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, १२ आणि १३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा म़ॉन्सून सक्रिय होणार – हवामान विभाग
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी माहिती देताना सांगितले की, “दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उद्या आणि परवा (१२-१३ जून) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १४ जूनपासून राज्यात पुन्हा मॉन्सूनच्या हालचाली वेग घेणार असून, १५ जूननंतर घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर अधिक वाढेल.”
बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे बदल-
सानप पुढे म्हणाले की, “बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे मॉन्सून वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे १३ जूननंतर राज्यात पुन्हा पावसाची सक्रियता वाढेल. विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अजून मॉन्सून दाखल झालेला नाही. मात्र १३ ते १९ जूनदरम्यान या भागांमध्येही मॉन्सून पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.”
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला-
राज्यात अजूनही सर्वत्र पावसाळा पूर्णपणे स्थिरावलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सानप यांनी स्पष्ट केलं की, “फक्त ज्या भागांत ९० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तिथेच पेरणी करावी. जिथे पावसाची कमतरता आहे, तिथे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.”
ठळक बाबी :
-१२-१३ जून: कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’
-दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
-१४ जूननंतर राज्यभर मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता
-१५ जूननंतर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा
-कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरीचा सल्ला
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार