September 12, 2025

महापालिकेची प्रभाग रचना पारदर्शकपणे करा – सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे, १३ जून २०२५ ः महापालिकेच्या निवडणुकीला उशीर झाला आहेच, पण आता प्रभाग रचना केली जात असताना ती पारदर्शकपणे व सूत्राला धरून केली पाहिजे. कोण काय सांगत आहे यावरून प्रभाग रचना केली जाऊ नये अशी मागणी आज केली. त्याच प्रमाणे संपूर्ण राज्यातील प्रभागरचना पारदर्शक झाली पाहिजे, अशी मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

खासदार सुळे यांनी महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद केला. आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतकराचा विषय महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या आधी एक न्याय आणि आता निवडणूक झाल्यानंतर वेगळा न्याय लावला जात आहे. या भागात कसल्याही सुविधा दिल्या जात नसताना कर कसला गोळा करता असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

सुळे म्हणाल्या, आयुक्त राम यांनी यापूर्वीही पुण्यात काम केले आहे, त्यांना दिल्लीचा देखील अनुभव आहे. आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी अशी मागणी होती. संतोष जगदाळे यांची मुलगी
आसावरी जगदाळेला महापालिकेत नोकरी मिळावी अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याबद्दल आभार, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याची आठवण आज करून देण्यात आली. गंगाधाम चौकात अपघात झाला, अशाप्रकारे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत, तेथे सुधारणा झाल्या पाहिजेत. तसेच पाणी रस्ते, पावसाळ्यापूर्वीच्या तयारीची कामे, याचा आढावा घेतला
पालखीच्या तयारीसाठी देखील चर्चा झाली आहे, असे सुळे यांनी सांगितले.

आघाडीचा निर्णय स्थानिक नेते घेतली
गेल्या २६ वर्षापासून महापालिकेत कोणासोबत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक नेते घेतात. महापालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे त्याचा निर्णय तेच घेतील. पवार साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले, त्यांनी स्वतःकडे ताकद न ठेवता स्थानिक नेत्यांनाही अधिकार दिलेले आहेत, असे सुळे यांनी सांगितले.