September 12, 2025

पुणे जिल्ह्यासाठी ११५ नवीन आधार नोंदणी संचांना मंजुरी

पुणे, १३ जून २०२५: पुणे जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्रांसाठी नवीन संचांचे वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज मागवले होते. यासाठी एकूण ३५६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २७२ अर्ज पात्र ठरले आहेत.

या पात्र अर्जदारांमध्ये १२ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोडतीत ११५ पात्र अर्जदारांना अटी व शर्तीच्या अधीन राहून नवीन आधार नोंदणी संच मंजूर करण्यात आले.

ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी एकूण ६५ रिक्त केंद्रे जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी ६२ अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आले. नगर परिषद कार्यक्षेत्रातील ७ रिक्त केंद्रांसाठी आलेल्या ७ अर्जदारांनाही मंजुरी मिळाली. पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील २२ रिक्त केंद्रांसाठी २२ अर्जदारांना, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील २८ रिक्त केंद्रांपैकी २४ अर्जदारांना आधार केंद्र मंजूर करण्यात आली.

या वितरण प्रक्रियेसाठी आयोजित सोडतीवेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी श्रीमती पल्लवी घाटगे तसेच आधार संच वितरण समितीचे सदस्य उपस्थित होते.