October 20, 2025

अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर अचूक मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, २४ जून २०२५: जिल्ह्यातील नागरिकांनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ग्रामपंचायतीमार्फत विविध आरटीएस (Right to Services) सेवा घेताना अर्जात आपला अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

जिल्ह्यात सेतू, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना शासकीय सेवा पुरविण्यात येतात. या सेवांचा लाभ घेताना ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अर्जदारांनी ‘ॲप्लिकेशन डिटेल्स’ विभागात मोबाईल क्रमांक अचूकपणे भरावा, असे डॉ. डूडी यांनी स्पष्ट केले.

अर्ज प्रक्रियेची स्थिती – जसे की मंजुरी, नामंजूरी, अथवा अर्ज परत पाठविला गेल्याची माहिती – एसएमएसद्वारे अर्जदाराला वेळेवर कळते. यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार भेटी देण्याची गरज भासत नाही.

सेवा वितरणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अचूक संपर्क क्रमांक नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ‘आपले सरकार सेवा केंद्रांनी’ आणि संबंधित पर्यवेक्षीय संस्थांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.