October 20, 2025

पुणे: लोहगावला पाण्याच्या टाक्यांचा मार्ग मोकळा; वनमंत्री नाईक यांचा तातडीने जागा हस्तांतरित करण्याचा आदेश

पुणे, २७ जून २०२५ : पुण्यातील वनभवन येथे वनमंत्री गणेश नाईक आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत वडगावशेरी परिसरातील विविध प्रलंबित विकासकामांशी संबंधित वनजमिनीच्या हस्तांतरणावर सखोल चर्चा झाली. आमदार पठारे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत नागरिकांच्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या, ज्याला वनमंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

या बैठकीत लोहगाव येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या डोंगरावर असलेल्या स.नं. ३०४ मधील वनजमिनीवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून एक एमबीआर, एक संप वेल आणि दोन नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव हा चर्चेचा प्रमुख विषय होता. सुमारे ०.९७५९ हेक्टर जागेची आवश्यकता असून, प्रस्ताव सादर करून अनेक महिने उलटले तरी प्रत्यक्ष जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली नव्हती. यामुळे लोहगाव परिसरातील जलप्रकल्प रखडला असून नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हा संपूर्ण विषय आमदार पठारे यांनी स्पष्टपणे मंत्र्यांसमोर मांडला.

मंत्री गणेश नाईक यांनी लगेचच सकारात्मक निर्णय घेत पुणे महानगरपालिकेला जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे लोहगाव परिसरातील सुमारे ५० टक्के भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता आमदार पठारे यांनी व्यक्त केली.

याशिवाय, आमदार पठारे यांनी मौजे निरगुडी व वडगाव शिंदे येथील वनजमिनीवर उच्च दर्जाचे वनउद्यान विकसित करण्याची मागणी मांडली. लोहगाव ते निरगुडी मार्ग वनहद्दीतून जात असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर उपाय म्हणून हा मार्ग चऱ्होली व निरगुडीच्या पश्चिम सीमेवरून स्थलांतरित करण्याचाही प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. या सर्व प्रस्तावांना वनमंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खराडी ते शिवणे रस्त्यावरील स.नं. ५७ मधील ०.३८४ हेक्टर वनजमिनीचा वापर रस्ते विकासासाठी करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली, ज्यावरही सहमती दर्शवण्यात आली.

या सर्व निर्णयांमुळे वडगावशेरी मतदारसंघातील पाणी, वाहतूक, रस्ते आणि पर्यावरणविषयक अनेक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीनंतर आमदार बापूसाहेब पठारे आणि आमदार महेश लांडगे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानले. धानोरी ते चऱ्होली या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक असलेली वनजमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मंत्री नाईक यांचे विशेष कौतुक केले.