October 27, 2025

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत विशेष आर्थिक समावेशन मोहीम

पुणे, ०३ जुलै २०२५: जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जिल्हा प्रशासन व अग्रणी बँक व्यवस्थापनाच्या समन्वयाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबविण्यात येत आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कळविले आहे.

ही मोहीम भारत सरकार, अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीक विशेषतः ग्रामीण व मागास भागातील महिला, वृद्ध नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यात वित्तीय जागरूकता निर्माण करणे आहे. या उपक्रमात महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम बनवणे तसेच डिजिटल साक्षरता याच्याकडे विशेष लक्ष देणेत येईल.

डिजिटल आर्थिक साक्षरता, जबाबदारीने कर्ज घेणे व परतफेड, ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, जनधन खात्याचे केवायसी नूतनीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती दिली जाणार आहे. अनेकदा नागरिकाना या योजनविषयी माहिती नसते किंवा ते सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सहभागी झालेले नसतात. मेळाव्यादरम्यान सामाजिक सुरक्षा योजनामध्ये सहभाग न घेतलेल्या नागरिकांचे अर्ज भरून घेऊन त्यांना योजनेत समाविष्ट केले जाईल.

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या ग्रामीण शाखा या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतील. सर्व बँक शाखांमार्फत गावोगावी जनजागृती शिबिरे आणि प्रचार कार्यक्रम राबविले जातील. दुर्गम व दुर्लक्षित भागांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाईल. सर्व बँका त्यांना नेमून दिलेल्या गावात मेळावे घेणार आहेत. मेळावे आयोजनासाठी व गावामध्ये माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी बँक प्रशासनाला मदत करावयाची आहे.

सर्व नागरिक, स्वयं-सहायता समूह, ग्रामस्तरीय अधिकारी, पंचायत प्रतिनिधी आदींना या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी किंवा आपल्या परिसरातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नजीकच्या बँक शाखेशी किंवा पुणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.