मुंबई, ५ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सात गावे समाविष्ट करून त्यांचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्याच्या मागणीवर आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात अधिकृत निवेदन दिले.
या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, तसेच वसंत साखरे, प्रकाश बुचडे, आनंद बुचडे, तानाजी हुलावळे, संजय जाधव, रोहन जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व आयटी कर्मचारी उपस्थित होते.
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी) आणि सांगवडे, गहुंजे (ता. मावळ) यांना महापालिकेत समाविष्ट करण्याचे निवेदन आहे.
या भागांचा समावेश करण्यासाठी महापालिकेने २०१८ सालीच प्रस्ताव पाठवला होता, मात्र अद्याप निर्णय लांबणीवर आहे.
मुख्य मागण्या व कारणे:
* आयटी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रामुळे वाढलेला लोकवस्तीचा ताण
* अंदाजे २ लाखांची तरंगती लोकसंख्या
* मूलभूत नागरी सुविधांची वानवा
* शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
समावेश झाल्यास फायदे:
1. नियोजनबद्ध नागरी विकास
2. जलद व एकसंध प्रशासन
3. वाहतूक व पायाभूत सुविधांची सुधारणा
4. महसुलीत वाढ व औद्योगिक सहकार्य
आमदार शंकर जगताप म्हणाले, “या गावांचा विकास ग्रामपंचायतींच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी या गावांचा महापालिकेत समावेश अत्यावश्यक आहे.”
या मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
More Stories
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पावसामुळे हैराण धानोरी, वडगावशेरी, खराडी परिसर; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात ठोस उपाययोजनांची मागणी
पुणे: महाराष्ट्र शासन शहरात कर्करोग रुग्णालय कधी उभारणार; आमदार पठारे यांची मागणी