पुणे, ८ जुलै २०२५: पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव अधिक सुसंगत आणि सुलभ बनविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कडून हडपसर रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित बसस्थानकासाठी जागेची पाहणी करण्यात आली. पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) यांनी ८ जुलै रोजी या ठिकाणी भेट देऊन प्रस्तावित टर्मिनलसाठी संभाव्य जागेची तपासणी केली.
भविष्यात हडपसर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये पीएमपीएमएल बसस्थानक व पार्किंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत मागणी करण्यात आली आहे. या सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांना शहराच्या विविध भागांशी जलद आणि थेट बस कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
सध्याची सेवा आणि अडचणी
हडपसर रेल्वे स्थानकाकडे सध्या बसमार्ग क्र. १५६ अंतर्गत शटल सेवा चालू आहे. तसेच बसमार्ग क्र. १६०, १६८ व १६९ च्या बसेसना स्थानकाजवळ थांबा देण्यात आलेला आहे. प्रवाशांना यामुळे काही मिनिटांत रेल्वे स्थानकात पोहोचता येते. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे सध्याच्या शटल सेवा अडथळ्यांना सामोऱ्या जात आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणीदरम्यान पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, हडपसर डेपो मॅनेजर समीर आतार, रेल्वे प्रशासनाचे चिफ प्रोजेक्ट मॅनेजर संजय लोहात्रे, वरिष्ठ अधिकारी सक्सेना, चिफ बुकिंग ऑफिसर सोनटक्के यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिपा मुधोळ-मुंडे यांचा पुढाकार
“रेल्वे प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि पीएमपीएमएलची सेवा प्रभावी बनवणे हा आमचा उद्देश आहे. प्रस्तावित जागा मिळाल्यानंतर पुण्याच्या प्रमुख भागांशी थेट बससेवा उपलब्ध होईल. रेल्वे आणि बस सेवा यांचा समन्वय साधून प्रवास अधिक सुलभ होईल,” असे दिपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार